मुंबई – निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने विजय सेथूपती आणि विक्रांत मस्से यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मुंबईकर’ या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. बॉलीवूडसाठी २०२१ एक नवी संधी घेऊन आलेले आहे.
दिग्दर्शक एस.एस. राजामौलीनंतर आता करण जोहरनेही नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. मुंबईकर या चित्रपटाचे पोस्टर जारी करताना ही एक अॅक्शन थ्रीलर फिल्म असून यात मुंबईतील अनेक पैलूंचा समावेश करण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.
सोशल मिडीयवर करणने चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या चित्रपटातून एक दमदार अनुभव प्रेक्षकांना मिळणार असल्याचा दावा करण जोहरने केला आहे. स्लमडॉग मिलेनियर आणि गली बॉयनंतर चित्रपटातून मुंबईला एका नव्या दृष्टीतून बघण्याची संधी प्रेक्षकांना असेल. या चित्रपटात संतोष सिवान सिनेमॅटोग्राफर आहे.
करण म्हणतो, ‘संतोष सिवान आणि विजय सेथूपती यांच्यासारख्या दिग्गजांचा माझ्या चित्रपटात समावेश असल्याचा अभिमान आहे. दोघेही जेन्टलमन आहेत.’ मला स्वतःलाही चित्रपट बघण्याची उत्सुकता लागलेली आहे, असेही करण म्हणतो. संतोष सिवान म्हणाले, ‘प्रत्येक शहराचे स्वतःचे एक सौंदर्य असते. हेच मुंबईलाही लागू होते.
मुंबईमध्ये मॅग्नेटीक आकर्षण आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातून लोक इथे येतात. ते प्रत्येक क्षेत्राचे, धर्माचे असतात. स्वप्न पूर्ण करणारे हे शहर आहे. काँक्रिटच्या जंगलात अनेकांच्या ह्रदयाची स्पंदने सामील आहेत. मुंबई हे एक मेट्रो शहर नक्कीच आहे, मात्र मुंबईकरांसाठी एक भावना आहे.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सिवाननेच केले आहे. यात विक्रांस मस्से, विजय सेथूपती, संजय मिश्रा, सचिन खेडेकर, रणवीर शौरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.