जिल्हा उपनिबंधकांना दिले पत्र…
कळवण- कळवण मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेच्या लाभांश वाटप निधी संशयित बुडीत निधी मध्ये वर्ग न करता सदर निधी सभासद कल्याण निधी मध्ये वर्ग करण्यात येऊन सदर रकमेचे वस्तू स्वरूपात सभासदांना वाटप करण्यात यावे अशी मागणी कमको चे माजी चेअरमन रविंद्र नथु शिरोडे यांनी केली असून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने लाभांश वाटपास परवानगी का दिली नाही याचा खुलासा करण्याचे आवाहन कमको बँकेला केले आहे.
कमकोची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या आठवड्यात होणार असून सभासदांना देण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस मध्ये मुद्दा क्रमांक 5 मध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकान्वये लाभांश वाटपास परवानगी दिलेली नसल्याने सदर रक्कम संशयित बुडीत निधी मध्ये जमा करण्यास कार्योत्तर मान्यता देण्याचा विषय घेण्यात आला आहे.यासंदर्भात कमकोचे माजी अध्यक्ष रविंद्र शिरोडे यांनी सहाय्यक निबंधक कळवण,जिल्हा उपनिबंधक नाशिक तसेच कमको बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांना निवेदन पाठवले आहे.त्यात शिरोडे यांनी म्हटले आहे की,लाभांश वाटप परवानगी बाबत सदर रक्कम संशयित बुडीत निधी मध्ये वर्ग करण्याचे प्रस्तावित आहे.तरी त्या विषयाच्या अनुषंगाने लाभांश वाटप निधी बुडीत खात्यात वर्ग न करता सदर निधी हा सभासद कल्याण निधी मध्ये वर्ग करण्यात यावा व भारतीय रिझर्व्ह बँकेने लाभांश वाटपास परवानगी का दिली नाही याची कारणे स्पष्ट करण्यात यावी.तसेच सदर लाभांश वाटप रक्कम त्वरित सभासद कल्याण निधी मध्ये वर्ग करण्यात येऊन सदर रक्कमेचे वस्तू स्वरूपात वाटप करण्यात यावे अशी मागणी शिरोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर शिरोडे यांच्यासह शेकडो सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सभासदांचे नुकसान टाळावे
दरवर्षी सभासदांना लाभांश वाटप करण्यात येते.त्यामुळे यंदा लाभांश वाटपाचा हा निधी संशयित बुडीत निधी मध्ये वर्ग करण्यात येणार असल्याने हा निधी सभासद कल्याण निधी मध्ये वर्ग करण्यात यावा व सभासदांना वस्तू रुपात त्याचे वाटप व्हावे आणि सभासदांचे नुकसान टाळावे अशी मागणी कमकोचे माजी अध्यक्ष रविंद्र शिरोडे यांच्यासह सभासदांनी केली आहे.