नाशिक – कळवण येथील विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, कळवण लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयाचे माजी अध्यक्ष तसेच कळवण मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन सुनिल दत्तात्रेय शिरोरे (भाऊ) (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपासून मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
काही आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना नाशकातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारानंतर ते बरे होत होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे आज दुपारच्या सुमारास निधन झाले.
कळवण, देवळा व परिसरामध्ये अतिशय प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. लाडशाखीय वाणी समाजासह अन्य सामाजासाठीही ते सदैव तत्पर होते. कळवण शहराच्या विकासातही त्यांनी योगदान दिले. कृषी, व्यापार, सहकार, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. कळवण येथे प्रतिपंढरपूर असे विठ्ठलाचे मंदिर त्यांनी साकारले. त्याचा मोठा सोहळा संपन्न झाला. खासकरुन कळवण तालुका परिसरातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील व्यक्ती व कुटुंबांचा आधारवड म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मालती, सागर आणि चेतन ही मुले, कल्याणी ही मुलगी, भाऊ, वहिनी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष विलास शिरोरे यांचे ते बंधू होत.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (१६ जानेवारी) सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून (हरी ओम ऑइल मिल, जुना ओतूर रोड, कळवण) येथून अंत्ययात्रा निघणार आहे आणि कळवण अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.