मुंबई – भूतदयेच्या भावनेतून अनेक जण कबूतरला दाणे टाकतात. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सारख्या शहरात अगदी भरवस्तीत उंच इमारती, व्यापारी संकुले, अपार्टमेट, बंगले आदि ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कबुतरे दिसतात. मात्र कबुतरांमुळे जीवघेणा आजार पसरत असल्याचे समोर येत आहे. कबुतरांची विष्ठा आणि पंखांमधून हा संसर्ग होत आहे. म्हणूनच ठाणे महानगरपालिकेने कबुतरांपासून सावधान असे फलक शहरात ठिकठिकाणी लावले आहेत.
कबुतरांमुळे सेन्सिटिव्ह न्यूमोनिया हा आजार बळावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यामुळे कबुतरांना उघड्यावरील खाद्यपदार्थ टाकू नये, असे आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. या संबंधीच्या वैद्यकीय संशोधनातून अनेक गंभीर धोके समोर आले आहेत. या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणे असे आहे की, कबुतरांच्या विष्ठेत असा संसर्ग असतो की त्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते . आणखी गंभीर बाब म्हणजे या संसर्गाबदद्ल लवकर कल्पना येत नाही. घराच्या बाल्कनीत कबुतरांचं घरटे असेल तर याचा धोका आणखीन वाढतो.
पाळीव आणि वन्यजीवांविषयी संशोधन करणारे प्रा. व्ही. वासुदेव राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कबूतर वर्षाला ११.५ किलो एवढी विष्ठा करते. या विष्ठेत परजीवी वाढतात. हे परजीवी हवेत हा संसर्ग आणखी पसरवतात. त्यामुळे श्वसनाचे विकार, फुफ्फुसांना संसर्ग आणि शरीरात अॅलर्जी होण्याचा धोका असतो.दिल्लीमध्ये तर काही दिवसांपुर्वी या आजारामुळे एका महिलेमुळे मृत्यू झाला. सुरुवातीला त्यांच्या पोटात दुखत होतं आणि नंतर हा आजार वाढत गेला. त्याच्यावर कोणताही उपचार लागू पडला झाला.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कबुतरांमुळे होणारे बरेचसे आजार हे फुफ्फुसांच्या विकाराशी संबंधित असतात. त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. कबुतरांची संख्या वाढतेय तसंतसं या आजारांचं प्रमाण वाढत चालले आहे. खोकल्याचा विकार, श्वसनाचे त्रास, अंगदुखी, वजन कमी होणं, हलका ताप येणं हे सगळे आजार कबुतरांमुळे होऊ शकतात ठाणे, मुंबईसारख्या शहरांतही कबुतरांच्या वाढलेल्या संख्येबदद्ल वारंवार चिंता व्यक्त होत असते. युरोपातील अनेक देशांनी कबुतरांमुळे होणाऱ्या घाणीविरुद्ध मोहीम उघडली होती. तसेच कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच या पक्ष्यांचं खाद्य विकणाऱ्यांना दंड लावण्यात आला होता. आता ठाणे मनपाने देखील अशी मोहीम सुरू केली आहे.