नाशिक – प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांचे महत्त्व असते. त्यांच्या एकुण जडघडणीत त्यांचाच वाटा मोठा असतो. असे असले तरी आई सर्वांनाच जवळची वाटते. वडलांचे कष्ट माहित असूनही ते अोठावर कधी येत नाही. त्यामुळे मराठी कवितेत आईच्या कविता सर्वाधिक आहे. पण, बापाच्या कविता तुलनेत कमी आहे. पिंपळगाव बसवंत येथील कवी लक्ष्मण महाडिक यांच्या बापाच्या कविता तशा प्रसिध्द आहे. पण, याच तालुक्यातील चांदोरी येथील तरुण कवयित्री काजोल अशोक आहेरने लिहलेली बापास हेच ठावे ही कविता मात्र मनाला भिडणारी आहे. काजोल ही केटीएच महाविद्यालयात बँचरल अाॅफ आर्टस मधून शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. संगीत शिकत असतांना या तरुणीने बापाच्या कष्टाचे चित्रही तितक्याच ताकतीने आपल्या कवितेतून उभे केले आहे……
बापास हेच ठावे
शेतात राबणाऱ्या, बापास हेच ठावे
मातीमध्ये स्फुरावे,मातीमध्ये उरावे
खुंट्यावरी गुरांना, चाऱ्यात काय द्यावे
चारा नसेल तेव्हा, पाणीच दाखवावे
निष्पाप या गुरांना, आजन्म प्रेम द्यावे
शेतात राबणाऱ्या बापास हेच ठावे
शेतातल्या पिकाला,तो रोज घाम देई
होता पिकात वृद्धी, गालात स्मित येई
त्याने उभ्या पिकाला,डोळ्यांत साठवावे
शेतात राबणाऱ्या, बापास हेच ठावे
संपून आज गेला, दाणा घरात नाही
ओट्यावरील तान्हा, माईकडेच पाही
ओट्यावरी पिलाने, सांगा कुणा पुसावे
शेतात राबणाऱ्या,बापास हेच ठावे
शेतात राबणारी,ती माय मौन आहे
सोसून शांत होणे, हेही कमाल आहे
मौनास या तिच्याही, त्याचेच नाव द्यावे
शेतात राबणाऱ्या बापास हेच ठावे
शेतात राबणाऱ्या बापास हेच ठावे…
काजल अशोक आहेर
चांदोरी
महाविद्यालयाचे नाव- के. टी. एच. एम कॉलेज
शिक्षण – बॅचलर ऑफ आर्ट्स (शास्त्रीय संगीत)
गावाचे नाव – चांदोरी
Superb kajal
काजल,
अप्रतिम कविता लिहिलिस.शक्यतो संस्कृत शब्द टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर.त्यांना मराठी समानार्थी शब्द शोध .आपल्या लेखन प्रवासाला खूप सा-या शुभेच्छा.
लक्ष्मण महाडिक
धन्यवाद सर
मी नक्की प्रयत्न करीन…
Very nice kajal
Best Luck for your future