रायपूर (छत्तीसगड) – धमतरी जिल्ह्यातील गोजी गावात कबड्डी सामना रंगात आला असतानाच वीस वर्षाच्या खेळाडूचा दुर्देवी मृत्यू झाला. सामन्यादरम्यान तिथे बसलेल्या प्रेक्षकांनी या क्षणाचा व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
धमतरी जिल्ह्यातील कोक्री खेड्यातील रहिवासी नरेंद्र साहू हा गोजी गावात कबड्डी खेळत असताना प्रतिस्पर्धी गटातील खेळाडूंनी जोरात पकडल्याने त्याचा मृत्यू झाला. कुरुडचे पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी रामनरेश सेंगर म्हणाले की, साहू समोरच्या संघाच्या गटात गेला आणि जेव्हा तो परत येत होता, तेव्हा एका खेळाडूने त्याला पकडले आणि त्यानंतर इतर खेळाडूंनीही त्याला पकडले. त्याला श्वास घेता आला नाही. त्यामुळे तो बेशुद्ध पडला.
सहकारी खेळाडू आणि तेथे उपस्थित गावचे सरपंच यांनी तातडीने त्या खेळाडूला कुरुड रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास करणारे सेनगर म्हणाले, सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की, साहूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, परंतु आम्ही पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहत आहोत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/riteshmishraht/status/1352233151804841990