नाशिक – ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची झालेली झीज रोखण्यासाठी आणि शिवलिंग संवर्धनार्थ पाच सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात विश्वस्त समितीची नुकतीच बैठक झाली आहे.
पाच सदस्यीय समितीमध्ये विश्वस्त अॅड. भाऊसाहेब गंभीरे, मंडलेश्वर काळे, अविनाश गाडे, हेमंत गाडे आणि देवांग जानी यांचा समावेश आहे. इसवी सन ११०० सालापासून या मंदिराच्या नोंदी आहेत. मात्र, शिवलिंग हे त्याही पूर्वीच्या काळातले आहे. त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. शिवलिंगाला वज्र लेप करायचा की नाही याबाबत आतापर्यंत दुमत होते. मात्र, शिवलिंगाची झालेली झीज पाहता विश्वस्त आणि पुजारी यांनी वज्रलेपास अनुकुलता दर्शविली आहे. ही पाच सदस्यीय समिती आता यासंदर्भात अभ्यास करणार आहे. पुरातत्व विभागाची यासाठी मदत घेतली जाणार असून या विभागाचे रसायनशास्त्रज्ञ शिवलिंगाची पाहणी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तशी माहिती जानी यांनी दिली आहे.