नाशिक – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे आगामी महाशिवरात्र शासनाच्या नियमानुसार साजरी करण्याचा निर्णय पोलीस तसेच विश्वस्त पुजाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हाती घेण्यात आला.
सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. यामुळे महाशिवरात्रीच्या उत्सवात होणारी गर्दी कशी नियंत्रीत करायची याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचवटी पोलिस व विश्वस्त मंडळाने संयुक्त सभा घेतली. सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव, पोलीस निरीक्षक अशोक भगत, विश्वस्त मंडळाचे अॅड. भाऊसाहेब गंभीरे, मनपाचे विभागीय अधिकारी विवेक धांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाशिवरात्रीनिमित्त करावयाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. शासनाचे आदेश पाळून महाशिवरात्र साजरी करावी अशा सूचना यावेळी सहाय्यक आयुक्त जाधव यांनी दिल्या. त्यासाठी मंदिर परिसरात करावयाच्या बाबींची त्यांनी माहिती दिली. शासनाचे नियम पाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रवेशासाठी ही नियमावली ठरवून देण्यात येणार आहे. रीतसर परवानगी घेऊनच कार्यक्रम करावे लागतील अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोरोनाचे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या लेखी सुचना यावेळी पुजारी, विश्वस्तांना देण्यात आल्या.
सद्य परिस्थिती लक्षात घेता शिवभक्तांना घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी प्रक्षेपण करण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती यावेळी विश्वस्त गंभीरे यांनी दिली.