नवी दिल्ली – काश्मीर प्रश्नावरून तुर्की आता भारताविरुद्ध अपप्रचार करण्याचे केंद्र होऊ लागले आहे. तुर्कीत गेलेले काश्मिरी तरुण सोशल मीडियावर भारतविरोधी अपप्रचारांमध्ये सहभागी झाल्याचे पुरावे मिळाल्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहिण्याच्या तयारीत आहेत.
इराक, सीरिया आणि इतर देशातले हिंसाचाराचे व्हिडिओ आणि फोटो काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून अन्याय होत असल्याचं भासवून व्हायरल केले गेले होते. त्याचा तपास केला तेव्हा ते व्हिडिओ तुर्कीमधील बनावट अकाउंटवरून अपलोड केले गेल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर ते अकाउंट तिथे शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांचे असल्याचे पुरावे मिळाले, आतापर्यंत सहा जणांची ओळख पटली असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे, सर्वात प्रथम त्यांचा पासपोर्ट रद्द केला जाईल. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहण्यात येणार आहे. पासपोर्ट रद्द झाल्यानंतर ते भारतात परतल्यावर त्यांना अटक करण्यात येईल, असं एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितलं.
पाकिस्तानकडून तुर्कीला फंडिंग
दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याच्या कृतीवर एफएटीएफ आणि भारतीय गुप्तचर यंत्राणांची करडी नजर असल्यानं पाकिस्तानला भारतविरोधी अपप्रचार करणं कठिण जात होतं. तसंच सुरक्षा यंत्रणांच्या कठोरतेमुळे पाकिस्तानमध्ये जाणा-या काश्मिरी तरुणांची संख्याही घटली होती. ज्या विद्यार्थ्यांचे अॅडमिशन पूर्वी झालेले आहेत, तेच विद्यार्थी पाकिस्तानमध्ये जात आहेत. त्यामुळे काश्मिरी तरुणांना भारतविरोधी कृत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पाकिस्तान तुर्कीला तयार करत आहे.
देशातील इतर भागातील तरुणांनाही भारतविरोधी अपप्रचार करण्यासाठी तुर्कीमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याची शक्यताही वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त केली. यासाठी तुर्कीला जाणा-या तरुणांवर विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सुरुवातीलाच यावर नियंत्रण मिळवलं, तर पुढील काळात याला विक्राळ रूप धारण करण्यापासून रोखलं जाऊ शकतं.