अलिगड (उत्तर प्रदेश) – वधू-वराने आपल्या नातेवाईकांना किंवा पालकांना महागडे गिफ्ट मागताना आपण लग्नांमध्ये बघितले आहे. मात्र अलीगड येथील इगलास तालुक्यात चुरा नागलातील एका तरुणीने कन्यादानाच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनाआपल्या गावातील रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली आहे. ही अनोखी मागणी एकूण जिल्हाधिकारीही अचंबित झाले. त्यामुळेच त्याची देशभरात चर्चा होत आहे.
गावातील अर्धा किलोमीटर रस्ता तब्बल वीस वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्थेत आहे. त्याच्या बाजुला एक खड्डा आहे. खड्ड्यातील पाणी रस्त्यावरच भरलेले राहते. त्यामुळे वरातही वधूच्या दारापर्यंत येऊ शकणार नव्हती. जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी तरुणीने मागणी केल्यानंतर तातडीने प्रशासनाला आदेश दिले. २७ फेब्रुवारीला तरुणीचे लग्न आहे, त्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी ताकीद त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली आहे. कामात हयगय केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट बजावले आहे.
इगलास तालुक्याच्या चुरा नगला गावातील २५ वर्षीय करिश्माने बीएड केले आहे. रस्ता खराब असल्यामुळे गावातील लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे गावातील बहुतांश लोक गावाच्या बाहेर जाऊन लग्न करतात. मात्र करिश्माच्या नवऱ्याची वरात दारापर्यंत यावी, अशी वडिलांची इच्छा आहे. पण रस्ता खराब असल्यामुळे ते अशक्य होते. त्यामुळे करिश्माने थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच कामाला लावले. यापूर्वी तहसील कार्यालयाला बरेचदा विनंती करण्यात आली, अर्ज केले. पण कुणीही दखल घेतली नाही. शेवटी करिश्मा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली आणि कन्यादानाखातर रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी तिने मागणी केली.