नवी दिल्ली – एकेकाळी भारतात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की काय, अशी स्थिती होती. कुठलीही निवडणूक असू देत विजय काँग्रेसचाच होता. त्यातही अगदीच तुरळक अपवाद सोडले तर काँग्रेसला कोणत्याही घटक पक्षाच्या भरवश्यावर राहण्याची गरज नव्हती. मात्र आता चित्र बदलले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस याचा त्याचा आधार शोधत आहे.
भाजपने या पाचही राज्यांमध्ये पूर्वीपासून लक्ष केंद्रीत केले होते. पश्चिम बंगालमध्ये तर गेल्या दिड वर्षात भाजपने असे काही ठाण मांडले आहे की तृणमूल काँग्रेसपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण या संपूर्ण संघर्षात काँग्रेस कुठेच नाही.
प्रचारसभा आणि रॅलींमध्येही काँग्रेस घटक पक्षांवरच अवलंबून आहे. सत्तेच्या स्पर्धेत ते कुठेही नाहीत. तर तृणमूलकडे जनतेला आकर्षित करण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे एकूणच परिस्थिती भाजपसाठी अनुकूल आहे.
त्याचप्रमाणे आसाममध्ये काँग्रेसने जातीयवादी प्रतिमा असलेले बदरुद्दीन अजमल यांच्याशी हात मिळवणी केली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर होणारे राजकारण आता सर्वसामान्य हिंदू जनतेला चांगले कळून चुकले आहे. अर्थात हे राजकीय पक्षांनाही माहिती आहे त्यामुळेच ते हिंदू मतदारांना वेळोवेळी आमिषं दाखविण्याचा प्रयत्न करतात.
गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी शिवभक्त होऊन मंदिरांच्या चकरा मारत होते. तर अलीकडेच प्रियंका गांधींनी संगमावर डुबकी लावली. काँग्रेसचे सातत्याने कमकुवत होत जाणे भाजपसाठी फायद्याचे आहे. मात्र देशासाठी चांगले आहे.
कारण एकेकाळी काँग्रेस स्वतःच्या जोरावर विधानसभा निवडणूक लढायची. आता सहकाऱ्यांवर निर्भर आहे. आणि हे परावलंबन सातत्याने वाढत आहे. तामिळनाडूत द्रमुकने काँग्रेसला केवळ 25 जागा दिल्या, तर पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांनी केवळ 92 जागा दिल्या आहेत.
आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसकडे आघाड्यांचे नेतृत्व आहे हे खरे आहे. मात्र क्षमता पूर्वीसारखी नाही. आसाममध्ये काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत होती. आता तिथे पाच पक्षांशी हात मिळवावा लागला आहे. यात जातीयवादी प्रतिमा असलेल्या अजमलचाही पक्ष आहे.