ग्वाल्हेर – परिस्थितीसमोर हतबल होऊन, पोटासाठी म्हणून अनेकदा नको ती कामं करावी लागतात. अशाचप्रकारे परिस्थितीवश काही मुले रेल्वे स्थानकात, बस स्टँडवर भीक मागताना दिसतात. अशा मुलांना एक चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न अभ्युदय आश्रम ही संस्था करते आहे. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील या आश्रमात ही भीक मागणारी मुले चक्क कोडिंग शिकत आहेत. आणि याचे प्रशिक्षण त्यांना थेट अमेरिका आणि फ्रान्समधील तज्ज्ञ देत आहेत.
देहव्यापारासाठी बदनाम असलेल्या बेडिया जमातीतील महिला आिण त्यांच्या मुलांचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी अभ्युदय आश्रम ओळखला जातो. आता ते बसस्टँड, रेल्वे स्टेशन तसेच बाजारात भीक मागणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१७ पासून येथे अशा मुलांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आश्रमातच त्यांच्या राहण्याची, जेवणखाण्याची सोय केली जाते आहे. आता येथील मुलांची संख्या २५ झाली आहे.
ही मुले आता जवळच्याच सरकारी शाळेत शिकण्यासाठी जातात. यासोबतच त्यांना आश्रमात कॉम्प्युटरचे शिक्षण दिले जात आहे. त्यात आता कोडिंगची भर पडली आहे. यासाठी थेट अमेरिका आिण फ्रान्समधील तज्ज्ञ व्हर्चुअल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना कोडिंगचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे, हे तज्ज्ञ यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत. या आश्रमाशी संबंधित सोनू गुप्ता यांच्या प्रयत्नाने हे शिक्षण सुरू आहे. सुरुवातीला चार महिने कॉम्प्युटरचे बेसिक शिक्षण देण्यात आल्यानंतर आता कोडिंगच्या सहा महिन्यांच्या कोर्सला सुरुवात झाली आहे. या मुलांना परदेशी तज्ज्ञ काय बोलतात हे कळावे यासाठी आश्रमाने एका दुभाषीची नियुक्ती केली आहे.
कोडिंग म्हणजे काय?
कॉम्प्युटरला जी भाषा समजते, तिला कोडिंग म्हणतात. हे शिकल्यावर अॅप तसेच वेबसाईट बनवता येऊ शकते.