आचार विचारांनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कणखर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचा वेध घेणारा हा लेख
साधारणत एकशे पाच वर्षांपूर्वीची ही घटना आहे, भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या काशी या तीर्थक्षेत्री एक किशोरवयीन मुलगा आपल्या मावशीच्या घरी राहून शालेय शिक्षण घेत होता. शाळा नदीच्या पैलतीरावर होती. नदीवर पूल नव्हता, मुलाच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने नावेतून जाणे इतके पैसे नव्हते. म्हणून नदी पोहून तो शाळेत जात असे, कधी नदीतीरावर ओले कपडे बदलून घेत असे तर कधी पावसाळ्यात ओल्या कपड्यानेच शाळेत जात असे कारण दोन कपड्याच्या जोडीशिवाय तिसरा कपडा अंगावर घालण्यासाठी नसे, परंतु मनात शिकण्याची जिद्द होती, कार्यकर्तृत्वाने मोठे होण्याची आकांक्षा होती, आणि कालांतराने खरोखर घडले . आपल्या कार्यकर्तृत्वाच्या पंखाने या मुलाने यशाचे सर्वोच्च शिखर गाठले, परंतु आपली साधी राहणी आणि उच्च विचार सोडले नाहीत. कोण होता हा मुलगा… ते होते, आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री.
देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्यावर त्यांच्याकडे स्वतःचे घर नव्हते, इतकेच नव्हे तर अंगातील कोट देखील एकच होता. कारण ते आयुष्यभर सत्य अहिंसा, त्याग, देशभक्ती यांची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींच्या आचार विचारांचे खरे पाईक होते. किंबहुना वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी महात्मा गांधी यांचे भाषण ऐकले आणि त्यांच्या विचाराने ते प्रेरित झाले. कालांतराने महात्मा गांधींच्या पायाजवळ बसून त्यांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. दोघांचे स्वभाव आणि आचार विचार बरेचसे सारखेच होते, काही मतभेद देखील होते परंतु मनभेद नव्हते आणि विलक्षण योगायोग म्हणजे या दोन्ही महापुरुषांचा जन्म एकाच तारखेला दि. २ ऑक्टोबरला झाला होता. परंतु दोघांमध्ये दोन पिढ्यांचे आणि दोन तपांचे अंतर होते. दर बारा वर्षानंतर एक पिढी बदलते, असे म्हटले जाते. महात्मा गांधी हे शास्त्रीजी यांच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी मोठे होते. महात्मा गांधी यांच्या विचारांना आज संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. महात्मा गांधी यांचे कार्य कर्तृत्व आणि आचारविचार महान आहेत. त्यांच्या आचार विचारांचा वसा आणि वारसा घेऊन शास्त्रीजी यांनी आयुष्यभर कार्य केले. तर त्यांचे कार्य विचारात घेऊनच महात्मा गांधी यांनी आचार्य विनोबा भावे, पंडित नेहरू यांच्या बरोबरीनेच वैयक्तिक सत्याग्रहासाठी शास्त्री यांची निवड केली होती.
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दि. २ ऑक्टोबर १९०४ रोजी काशी (वाराणसी) येथे झाला. त्यांचे वडील शारदाप्रसाद श्रीवास्तव हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शास्त्रीजी दीड वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले . त्यामुळे त्यांच्या आई रामदुलारी देवी ह्या आपल्या मुलांसह मिर्झापूर येथे माहेरी आल्या. तिथेच शास्त्रीजी यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी शास्त्रीजी पुन्हा वाराणसी येथे आपल्या मावशीकडे आले. या ठिकाणी त्यांना निष्कामेश्वर प्रसाद या आदर्श गुरुजींचा सहवास लाभला. गुरुजींनी शास्त्रीजींना महात्मा गांधी, लाला लजपत राय यांचे जीवन कार्य समजून सांगितले. इ. स. १९२५ च्या सुमारास भारतात स्वातंत्रता आंदोलनाने वेग घेतला होता. त्याचवेळी या चळवळीत सहभागी झाल्याने शास्त्रीजींचे शिक्षण खंडित झाले. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. त्यामुळे काशी विद्यापीठाने त्याच वर्षी त्यांना शास्त्री ही पदवी प्रदान केली. लालबहादूर हे आता शास्त्रीजी बनले होते. त्याच पदाचे पुढे जाऊन आडनावात रूपांतर झाले.
महात्मा गांधी यांच्या सहवासात येण्यापूर्वी शास्त्रीजी शिक्षण घेत असतानाच लाला लजपत राय , पुरुषोत्तम दास टंडन, आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास , डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश जी यांच्या संपर्कात आले. लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या सर्हन्टस ऑफ द पीपल सोसायटी या संस्थेचे ते अध्यक्ष बनले. या संस्थेमार्फत समाजासाठी विधायक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना आदर्श आणि संस्काराचे पाठ शिकविले जात असत. पुढे स्वदेशी आंदोलनात सहभागी झाल्यावर शास्त्रीजींना कारावास भोगावा लागला. कारागृहात जाण्यापूर्वी त्यांचा ललितादेवी यांच्याशी विवाह झाला होता. त्या दोघांना वैयक्तिक आयुष्यात अनेक संकट तोंड द्यावे लागले. त्यांच्या मुलीचे आजारपणात निधन झाले.
कारागृहात असताना शास्त्रीजी यांनी कांट, हेगेल, रसेल, कार्ल मार्क्स त्यांच्या ग्रंथांचे वाचन केले, इतकेच नव्हे तर त्यांनी मेरी क्युरी या शास्त्रज्ञांच्या चरित्राचा अनुवाद देखील केला. कारागृहातून सुटल्यावर शास्त्रीजी यांनी अलाहाबाद हीच आपली कर्मभूमी मानली . तेथेच त्यांना मोतीलाल नेहरू आणि पंडित नेहरू यांचा सहयोग घडला. पंडित नेहरू यांचा शास्त्रीजी
यांच्या कार्यावर पूर्ण विश्वास होता. कालातंराने हा विश्वास दृढ होत गेला. इ. स.१९३७ मध्ये शास्त्रीजी विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी शास्त्रीजींना पार्लमेंट सेक्रेटरी आणि नंतर मंत्री म्हणून निवडले . १९५१ मध्ये पंडित नेहरू यांनी त्यांना पक्षाचे सचिव नेमले, १९५२ मध्ये ते रेल्वे मंत्री झाले. रेल्वे सेवेत त्यांनी अनेक सुधारणा केल्या. मात्र दक्षिण भारतात एक मोठा रेल्वे अपघात झाला असता या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला. कालांतराने पुन्हा १९५७ मध्ये ते दळणवळण मंत्री तर १९६१ मध्ये गृहमंत्री झाले.
पंडित नेहरू यांच्या निधनानंतर सर्व देश सुन्न झाला होता. तेव्हा दि. ९ जून १९६४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेऊन शास्त्रीजीं यांनी कणखरपणे देशाचा राज्यकारभार सांभाळला. १९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देऊन सैन्याचे मनोबल वाढविले आणि भारतीय सैन्याने पाकिस्तानची दाणादाण उडविली . त्यानंतर भारत-पाक यांच्या युद्धविराम होऊन ताश्कंद करारासाठी शास्त्रीजी रशियाला गेले. तेथे दि. ११ जानेवारी १९६६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)
लेख उत्तम आहे
या लेखात शास्रीजींंचा आदर्श जीवन परीपाठ थोडक्यात व उत्तम आला आहे