नवी दिल्ली ः केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शनिवारी संयुक्त किसान मोर्चातर्फे देशव्यापी चक्काजाम सुरु झाले आहे. २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन शांततेत होण्यासाठी मोर्चातर्फे मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत आहे.
दुसरीकडे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. निमलष्करी दलाच्या १५० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सीमाभागात अनेकस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवल्यानंतर पोलिसांनी रस्त्यांवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. सीमाभागात बहुस्तरीय बॅरिकेड्स, काटेरी तारा आणि खिळ्यांचे अडथळे लावण्यात आले आहेत. सीमाभागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. तसंच कॅमे-याद्वारे चित्रीकरणही करण्यात येणार आहे, असं अधिका-यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर नजर
चक्काजाम आंदोलनादरम्यान, दिल्ली पोलिसांचा सायबर विभाग सोशल मीडियावर नजर ठेवणार आहे. ५० पोलिसांना या कामासाठी निवडलं आहे. अनेक ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतरही ट्विटरसह सोशल मीडियाच्या अन्य व्यासपीठांवरून आंदोलनाबाबत उत्तेजित करणारे ट्विट केले जात आहेत. त्या अकाउंटवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दिल्लीत कोणतेही असमाजिक तत्व घुसून हिंसाचार करणार नाही यासाठी मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे, असं दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते चिन्मय बिस्वाल यांनी सांगितलं.
संयुक्त किसान मोर्चाची मार्गदर्शक तत्वे
देशात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर चक्काजाम केले जात आहे. रुग्णवाहिका, स्कूलबस यासारख्या अत्यावश्यक सेवांना थांबविण्यात येणार नाही. आंदोलन पूर्णपणे शांततेनं होईल. यादरम्यान कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा सामान्य माणसांशी वाद करून संघर्षाची परिस्थिती निर्माण करू नये. दिल्ली, एनसीआरमध्ये चक्काजाम केला जाणार नाही. दिल्लीत प्रवेश करणारी सगळे मार्ग खुले राहतील. ३ वाजून १ मिनिटापर्यंत हॉर्न वाजवून चक्काजाम आंदोलन समाप्त होईल.
तीन राज्ये सोडून देशभर शेतकऱ्यांचा आज चक्काजाम
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान शनिवारी देशात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे. किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितलं, की जे लोक इथं येऊ शकले नाहीत, ते आपापल्या ठिकाणी शांततेनं चक्काजाम करतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये चक्काजाम होणार नाही, असंही राकेश टिकैत यांनी स्पष्ट केलं.
तीन राज्यात चक्काजाम होणार नाही, ही आहेत कारणं
तीन राज्य उत्तर प्रदेश. उत्तराखंड आणि दिल्लीला सोडून देशात सगळीकडे चक्काजाम आंदोलन होईल. चक्काजाम आंदोलनादरम्यान काही लोक हिंसाचार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमच्याकडे पक्के पुरावे आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीला आंदोलनापासून दूर ठेवलं, असं राकेश टिकैत यांनी सांगितलं. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी चक्काजाम करण्यासंदर्भात संपर्क साधला नसला तरी दिल्ली, हरियाणा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.