मुंबई – राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थेचे वातावरण आहे. या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य कोलमडून पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या सर्व घटकांशी चर्चा करावी आणि नव्याने आदेश काढावेत, अशी आग्रही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होणार आहे. ही बाब गंभीर आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.