नाशिक – पोलिस कंट्रोल रुमला फोन करुन तेथील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. हमाली काम करणाऱ्या या संशयिताविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष तुकाराम खिराळे (वय ५४) असे संशयिताचे नाव आहे. पोलिस नियंत्रण कक्ष येथे फोन करून महिला अधिकाऱ्यास अपशब्द बोलून तो त्रास देत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आयपीसी १८६ आणि ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यक्तीचा पोलिसांनी कसून शोध घेतला. पूर्वी नमूद पत्त्यावर तो वॉचमन म्हणून काम करीत होता. मात्र तो फिरस्ता असायचा. तो एकटाच राहत असल्याचेही पोलिसांना समजले. त्याला ओळखणाऱ्या एका वॉचमनच्या मदतीने पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर पाथर्डी परिसरातून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो हमाली काम करतो, मिळेल तेथे झोपतो, दारू पिण्याची त्याला सवय आहे, असेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्याला अटक केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.