बीजिंग – राजकीय आणि लष्करीदृष्टया अडचणीत आलेल्या पाकिस्तानवर दिवसेंदिवस चीनच्या कर्जाचे ओझे वाढत आहे. एकेकाळी जवळचे मित्र असलेल्या सौदी अरेबियाचे कर्ज फेडण्यासाठी पाक सतत चीनकडून कर्ज घेत आहे. परिणामी पाकिस्तानला चीनची प्रत्येक कायदेशीर व बेकायदेशीर अट मान्य करण्यास भाग पाडले जात आहे.
अशी आहे थकबाकी
चीनने पाकिस्तानला दीड अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ११ हजार कोटी रुपये मदत मंजूर केली आहे. या रकमेसह पाकिस्तान सौदी अरेबियाचे दोन अब्ज डॉलर म्हणजे सुमारे १४ हजार ५०० कोटी रुपये कर्ज परत करावे लागणार आहे. सौदी अरेबियाच्या एक अब्ज डॉलर्सची थकबाकी आणि जानेवारीत उर्वरित एक अब्ज डॉलर्स पाकिस्तान लवकच परतफेड करेल. चीनने ही रक्कम आपल्या परकीय चलन प्राधिकरणामार्फत दिली किंवा ती आर्थिक कर्ज म्हणून दिली गेली, याचे चीनने स्पष्टीकरण दिलेले नाही.
असे वाढतेय कर्ज
पाकिस्तानवर चीनच्या कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) प्रकल्पांतर्गत रेल्वे उभारणीसाठी चीनकडून २ अब्ज डॉलर्स कर्ज घेण्याचे पाकिस्तानने ठरवले. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानच्या विधानानुसार, पाकिस्तानने चिनी कर्जाच्या बदल्यात गेल्या आर्थिक वर्षातच २०.५ अब्ज पाकिस्तानी रुपयांचे व्याज दिले आहे. गेल्या काही वर्षांत चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा सावकार बनला आहे. चीन केवळ पाकिस्तानच्या विकास योजनांसाठी कर्ज उपलब्ध करुन देत नाही तर इतर देशांची कर्जे फेडण्यासाठी निधीही देत आहे.
पुरवठा बंद
पंतप्रधान इम्रान खान यांच्या २०१८ मध्ये दोन वेळा झालेल्या भेटीनंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानला तीन वर्षांसाठी ६.२ अब्ज डॉलर्स कर्ज देण्यास सहमती दर्शविली. त्यापैकी तीन अब्ज डॉलर्स रोख आणि उर्वरित तेल आणि वायूच्या स्वरूपात आहे. तेल आणि गॅस दराचे कर्ज दरवर्षी परतफेड करायचे होते. या संदर्भात पाकिस्तानला दरवर्षी एक अब्ज डॉलर्स तेल आणि गॅसचे मूल्य परत करावे लागतात. त्याशिवाय पूर्वीच्या थकबाकीमुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानला तेल आणि गॅसचा पुरवठा बंद केला आहे.