मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अभिनेत्री कंगना राणावतला भेटायला वेळ असतो पण शेतकरी आंदोलकांना नाही, असे जोरदार टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोडले. महाराष्ट्राने आजवर असे राज्यपाल पाहिले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
पवार यांनी आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचे कौतुक केले. कडाक्याच्या थंडीतही आंदोलक विरोधासाठी ठामपणे उभे होते. गेल्या ६० दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन ऐतिहासिक आहे. हे आंदोलक शेतकरी काही पाकिस्तानातील आहेत का? पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांची चौकशी तरी केली का? राष्ट्रवादीचा शेतकरी आंदोलनाला भरघोस पाठिंबा असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. संसदेत चर्चा करता केवळ तिन्ही कृषी विधेयके मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली. हे योग्य नाही. लोकशाहीत विधेयकांवर योग्य ती चर्चा व्हायला हवी, असेही पवार म्हणाले. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही आस्था नसल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, खासदार कुमार केतकर, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय नेते या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
नव्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करायचा केंद्र सरकारचा मानस असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.यानंतर मोर्चासाठी जमलेल्या शेतकऱ्यांनी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/ANI/status/1353653829309353985