मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती
मुंबई : कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अन्न व औषध प्रशासनामार्फत संपुर्ण राज्यभरात कारवाया वाढविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने आता पर्यंत मुंबई व ठाणे येथे चार प्रकरणात कारवाई केली आहे, असे सांगुन डॉ. शिंगणे यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद येथुन येत असलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधले आहे. औषधांच्या काळाबाजाराला रोखण्यासाठी राज्यभर कारवाया होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून पोलिस गुप्तचर यंत्रणा व पोलिस प्रशासना मार्फत प्राधान्याने कारवाया करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती डॉ. शिंगणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्राद्वारे केली आहे.