नाशिक – औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध झाला असून निमाच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याची माहिती निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे व व्यवस्थापक अतुल दवंगे यांनी सगळ्या ऑक्सिजन सप्लायर्सला बोलावून याबाबतची माहिती दिली व आजपासूनच ऑक्सिजन सिलेंडर वितरित करण्याचे सांगितल्याचे ते म्हणाले. जिल्हा उद्योग केंद्राकडे ११६ खासगी कंपन्यांनी ८६६ सिलेंडरची मागणी केली होती. ती आता पूर्ण करण्यात आली आहे.
याबाबत चव्हाण म्हणाले की, विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे जास्तीत जास्त उद्योगांना लागणारा ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटला उपलब्ध करून व्हावा यासाठी औद्योगिक कारणासाठी लागणार पुरवठा बंद करण्यात आले होते . पण, आता अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे पुरवठा सुरळीत झाला आहे. निमाच्यावतीने अध्यक्ष शशिकांत जाधव खजिनदार कैलास आहेर सहसचिव सुधाकर देशमुख यांनी जिल्हा उद्योग केंद्राशी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक उद्योगांसाठी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्याकडून आदेश मंजूर करून घेतले आहेत . कोविड महामारी दरम्यान जिल्ह्यातील उद्योग आधीच मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले असताना उद्योग कशा पद्धतीने चालवावे हा गंभीर प्रश्न सर्वांसमोर निर्माण झालेला असतांना सदरच्या मंजूर झालेल्या आदेशामुळे उद्योजकांना काम करणे सुकर होईल असेही चव्हाण यांनी सांगितले.