नाशिक – गुजरात महाराष्ट्र सीमेवरून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्याकडून परिवहन विभागाकडे करण्यात आलेली आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष पी.एम सैनी, सल्लागार प्रदीप जोहर, संजय राठी, उपाध्यक्ष सुभाष जांगडा, देविदास हाकेरे, दीपक मांडलिक, भाऊसाहेब पाटील, प्रमोद देशमुख, रामभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष पी.एम सैनी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र गुजरात राज्यांची बॉर्डर असलेल्या पेठ, बोरगांव व सुरगाणा या मार्गे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असून याबाबत परिवहन विभागाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत जिल्ह्यातील विविध वाहतूक दारांकडून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांना अनेक निवेदने प्राप्त झालेली असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र व गुजरात सीमेवर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने परिवहन विभागाच्या नियमनुसार अंडरलोड वाहतूक करणाऱ्या वाहतूक दारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने व्यापारी वर्गाकडून अंडरलोड वाहतूक दारांना मात्र काम मिळत नसल्याचे त्याचा मोठा परिणाम वाहतूक व्यावसायिकांवर होत आहे. याबाबत परिवहन विभागाच्या वतीने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून वाहतूक दारांना दिलासा देण्यात यावा अन्यथा नाईलाजाने वाहतूकदार संघटनाना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे वाहतुकदारांनी दिलेल्या या निवेदनांचा विचार करून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.