आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नांना यश, शेतकरी बांधवानी आनंद व समाधान
कळवण – राज्याच्या अर्थसंकल्पात कळवण तालुक्यातील ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पसाठी ४ कोटी व सुरगाणा मतदारसंघात श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आमदार नितीन पवार यांना यश आल्यामुळे तब्ब्ल ४० वर्षानंतर ओतूर धरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ओतूर व श्रीभुवन प्रकल्पांच्या विकासकामांना गती मिळणार असल्यामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील
शेतकरी बांधवानी आनंद व समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे जागले आणि त्यांनी तालुक्यातील सप्तश्रुंगी गडावरील पाणी टंचाई व इतर विकास कामासाठी व ओतूर व श्रीभुवन प्रकल्पसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची घोषणा केल्यामुळे देवीभक्तांना व तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे सचीव, मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दिले होते तर श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाची नोव्हेंबर २०२० मध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सर्वेक्षण करुन प्रकल्पस्थळाची पाहणी केली होती तेव्हा श्रीभुवन परिसरातील पाणी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली होती. या दोन्ही सिंचन प्रकल्पाना अर्थसंकल्पात तरतूद झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमदार नितीन पवार यांनी प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पाळल्याने ओतूर व श्रीभुवन परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
ओतूर धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने काँक्रिटमध्ये सांडवा बांधण्यात येणार असून नवीन धरणासाठी जुन्या धरणाचे मटेरियल न वापरता नवीन गुणवत्तेचे साधन- साहित्य वापरण्यात येणार आहे. नवीन ओतूर धरण पूर्ण लांबीत नव्याने करण्यात येणार असून त्यासाठी ३९ कोटी २८ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असून ओतूर धरणातील अवैशिष्ट कामे, शिल्लक कामे,विशेष दुरुस्ती अंतर्गत अर्थसंकल्पात विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली आहे. श्रीभुवन प्रकल्प नवीन असून प्रकल्पाची किंमत ३३ कोटी रुपये असून अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद करुन प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे.या प्रकल्पामुळे २.४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार असून २२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.