पिंपळगाव बसवंत – आठवड्याच्या सुरुवातीपासून गायब झालेला पाऊस गुरुवार पासून सक्रीय झाला आहे. दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हानंतर सायंकाळी वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळी ५ वा सुमारास ओझर शहरासह परिसरात पावसाने आगमन केल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या सुरवातीपासून चित्र बदलले असून सायंकाळच्या वेळी पाऊस बरसत आहे. सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील काही मुख्य ठिकाणी पाणी साचले होते. तर पावसामुळे नागरिकांनाही गरमीपासून दिलासा मिळाला आहे. पुनरागमन झालेल्या या पावसामध्ये सातत्य राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे ओझर शहरातील व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.