जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची मोहीम
ओझर: कोरोनाची दुसरी लाट गतीमान झाली असताना त्याचा फैलाव शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.रोजची हजारोंच्या पटीत वाढणारी रुग्णसंख्या बघता ग्रामीण पोलीस दलाकडून पोलीस पाटलांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या माध्यमातून आता आरोग्य,स्थानिक प्रशासन बरोबरच पोलीस दल परिस्थितीवर वॉच ठेवण्यासाठी सज्ज झाल्याने मोठ्या प्रमाणात बाधित संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिणामकारक कारवाई होणेकरिता, जिल्ह्यातील गावांमधील पोलीस पाटील यांची विशेष पोलीस समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गावामध्ये कुठेही सार्वजनिक ठिकाणी विलीगीकरण केलेला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यास पोलीस पाटील यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे. तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले कोरोना बाधित रुग्ण जर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मिळून आल्यास आपले गावचे पोलीस पाटील किंवा नजीकचे पोलीस ठाण्यास माहिती द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
पोलीस पाटील यांना भौगोलिक अभ्यास
मागील वर्षी झालेले लॉक डाऊन आणि त्यावेळी होणारी कोविड रुग्ण संख्येची तुलना आताच्या परिस्थितीशी केली तर सध्याची लाट भीषण आहे. मोठ्या प्रमाणात संख्या फोफावत आहे.प्रत्येक गावाच्या विस्ताराचा विचार केल्यास पोलीस पाटील यांना भौगोलिक अभ्यास असल्याने त्यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.ही मोहीम योग्य पद्धतीने राबवण्यात येणार आहे.कार्यवाही पेक्षा काळजी घेणे फायद्याचे असल्याने संबंधित पोलीस ठाण्याशी संलग्न होऊन समन्वय मंडळ यावर नियंत्रण ठेवेल.
सचिन पाटील, पोलीस अधीक्षक,नाशिक