सिडनी – ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळेच पहिला वन डे सामना ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी जिंकला आहे. हार्दिक पांड्या आणि शिखर धवन हे वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने सहा गडी बाद ३७४ धावा केल्या. त्याबदल्यात भारताला ८ गडी बाद ३०८ धावाच करता आल्या. पहिल्या सामन्यात विजय मिळविल्याने तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन वन डे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे झाला. ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. ५० षटकात ऑस्ट्रेलियाने ३७४ धावा केल्या. एॅरोन फिंच आणि स्टिव्ह मिथ यांनी शतकी खेळी केली. तर, शिखर धवनने ७४ आणि हार्दिक पांड्याने ९० धावा केल्या. अन्य फलंदाजांना मात्र चमक दाखविता आली नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला.
कोरोना नंतर प्रथमच भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वातील परदेशात सामना खेळत आहे. स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा ऑस्ट्रेलियात समावेश असल्याने ऑस्ट्रेलियाचे पारडे जड होते. भारतीय संघात आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा नाही. दुखापतीमुळे तो सहभागी झालेला नव्हता. या मालिकेच्या निमित्ताने कोरोना लॉकडाऊनमुळे दूर असलेले प्रेक्षक स्टेडिअममध्ये प्रथमच आले. स्टेडिअममध्ये केवळ ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात आला.