नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पुढाकारातून दिनानी ट्रस्टच्या सहकार्याने ‘रोटरी रुग्ण साहित्य सेवा’ या ऑर्थोपेडीक उपकरणाच्या लायब्ररीचे उदघाटन रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकिर यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात हा समारंभ पार पडला.
कृषी, शिक्षण, सामाजिक, स्वच्छता, महिला सबलीकरण, रोटरी बाजार, यांसारख्या उपक्रमशील उपक्रमांसोबतच रोटरी क्लब ऑफ नाशिकने सामाजिक संस्थांच्या मदतीने आता आरोग्य क्षेत्रातही आपली पाळेमुळे रोवली आहेत. ऑर्थोपेडीक उपकरणाच्या लायब्ररीच्या माध्यमातून ‘रोटरी रुग्ण साहित्य सेवा’ उपक्रम नव्यानेच सुरु केला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित सेवा साहित्य उपलब्ध होणार आहे. व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर-स्टूल, रुग्ण पलंग, सि-पेप मशीन, बायपेप मशीन, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेशन मशीन यांसारखी उपकरणे दिनानी ट्रस्ट आणि देणगीदारांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिक येथे अनामत रक्कम तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रारंभी रोटरीच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी प्रांतपाल शब्बीर शाकिर तसेच रोटरीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी प्रांतपाल शाकीर यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडणारे विजय दिनानी आणि आर्थिक सहकार्य करणाऱ्या दिनानी ट्रस्टचे अध्यक्ष उपेंद्र दिनानी यांची प्रशंसा केली. काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलवर विक्रमी वेळात प्रवास करत विश्वविक्रम करणारा ओम हितेंद्र महाजन यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. सचिव विजय दिनानी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. रोटरी क्लबच्या ग्लोबल ग्रँटला भरीव योगदान देणारे सर्वश्री रवी महादेवकर, उदयराज पटवर्धन, प्रफुल बरडिया, डॉ. रामनाथ जगताप, संजय अग्रवाल, चैतन्य डबीर, शशिकांत व शिल्पा पारख आणि उर्मी दिनानी यांचा सत्कार केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री ओमप्रकाश रावत, डॉ. काकतकर, स्मिता अपशंकर, उर्मिला देवधर, विनायक देवधर यांनी परिश्रम घेतले. रुग्ण साहित्यासाठी विजय दिनानी मोबाईल ८४८४९४०३०८ पिंक फार्मसी, एन.डी.सी.सी बँकेसमोर, सीबीएस, नाशिक येथे संपर्क साधावा असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले आहे. सचिव प्रफुल बरडिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.