बंगळुरू – धकाधकीच्या आयुष्यात वेळ कमी असल्यानं ऑनलाइन अन्नपदार्थ मागवण्याचा ट्रेंड वाढला आहे. काही मिनिटांतच लोकांना त्यांच्या आवडीचे पदार्थ घरपोच मिळतात. परंतु कधीकधी अशा घटना घडतात ज्यामुळे आपण अन्नपदार्थ ऑनलाइन मागवावे की नाही, असा प्रश्न पडतो. बंगरुळूच्या एका युवतीनं आरोप केला, की ऑर्डर रद्द केल्यानं झोमॅटो बॉय चिडला आणि त्यानं तिच्या चेहर्यावर बुक्का मारला.
हितेशा चंद्राणी नावाच्या युवतीला इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये तिच्या नाकातून रक्त येत असल्याचं दिसत आहे. झोमॅटोनंसुद्धा तिची माफी मागितली असून, पोलिस कारवाईत पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.
हितेशानं झोमॅटोकडून ऑर्डर केली होती. परंतु ऑर्डर दिलेल्या वेळेनंतर पोहोचली. त्यानंतर कस्टमर केअरशी बोलून तिनं ऑर्डर रद्द केली. डिलिव्हरी बॉय आल्यानंतर तिनं ऑर्डर रद्द केल्याचं त्याला सांगितलं, परंतु त्यानं ऑर्डर परत नेणार नाही असं सांगून तिच्याशी हुज्जत घालू लागला. तिनं दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं दरवाजा उघडून तिच्या चेहऱ्यावर बुक्का मारला.
या घटनेत हितेशाच्या नाकातून रक्त आलं आणि तिच्या नाकाचं हाडसुद्धा तुटलं. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिनं पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्रामवर व्हि़डिओ शेअर केल्यानंतर झोमॅटोकडून प्रतिक्रिया आली. आवश्यक उपचारासाठी आणि पोलिस तपासात आपलं सहकार्य केलं जाईल असं झोमॅटोकडून सांगण्यात आलं. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कारवाई करण्याचं आश्वासनही दिलं.
https://www.instagram.com/tv/CMOJo0XnfET/?utm_source=ig_web_copy_link