ऑफलाईन परीक्षेसाठी ५० केंद्र निश्चित; परीक्षेच्या तारखेपुढे मात्र प्रश्नचिन्ह
पुणे – अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी पुणे विदयापीठातर्फे ५० केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष परीक्षेसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ५० परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून यासंबंधी अधिकृत माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिली आहे. ओएमआर शीटवर विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन यातील एका परीक्षा पद्धतीच्या निवडीसाठी ऑप्शन फॉर्म मागवले होते. त्याद्वारे इंटरनेट अभावी किंवा अन्य कारणांमुळे जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाही त्यांनी ऑफलाईन परीक्षा पद्धतीचा पर्याय निवडला आहे. यात पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील एकूण ५०००० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी ओएमआर शीटद्वारे परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ऑप्शन फॉर्मद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाद्वारे तीन राज्यातील एकूण १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा पद्धत निवडली आहे. तसेच ५०००० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा पद्धतीचा पर्याय निवडला आहे. पुणे जिल्ह्यातून २२००० विद्यार्थ्यांनी ऑलाईन परीक्षा पद्धत निवडली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. ज्या कॉलेजच्या इमारती तसेच संबंधित होस्टेलच्या इमारतीचे रूपांतर विलगीकरण कक्ष म्हणून केले आहे अशा कॉलेजच्या सहभाग यात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले असले तरी ऑफलाईन परीक्षा कधी होणार हा प्रश्न विद्यार्थ्यापुढे कायम आहे.