नाशिक – ऑनलाईन वाईन मागवणे एका वृद्धास चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन एक वाईनची बाटली मागवल्यानंतर त्यांचे बँक खाते हॅक करून भामट्याने वेळोवेळी त्यांच्या खात्यातून १ लाख १८ हजार ४५७ रूपये लंपास केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी प्रशांत गोविंद घाटनेकर (६४, रा. ग्रिन मिडोज अपार्टमेंट, म्हसोबा मंदिरजवळ, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार घाटनेकर यांनी १२ सप्टेंबर रोजी घरून ऑनलाईन वाईनची बाटली मागवली होती. या बाटलीची रक्कम भरण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्यांनी सांगीतल्या प्रमाणे घाटनेकर यांनी त्यांना आपल्या बँक खात्याची माहिती दिली. त्यावरून भामट्यांनी त्यांचे एचडीएफसी बँकेचे खाते हॅक करून वेळोवेळी आतापर्यंत १ लाख १८ हजार रूपये लंपास केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल रोहकले करत आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक – अल्पवयीन मुलीस कपडे व चप्पल घेऊन देण्याचे अमिष दाखवून घरात बोलावत विनयभंग करणार्या संशयितावर विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश मनोज श्रीवंत (२३, रा. मालधक्का, गुलाबवाडी, नाशिकरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी अंगणात खेळत असताना संशयिताने तीला नवीन कपडे व चप्पल घेऊन देतो असे अमिष दाखवत घरात बोलावून घेतले. घरात बोलावून त्याने तीचा विनयभंग केला. ही बाब मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर शनिवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयितास लगेच अटक केली आहे.
दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार
नाशिक – भरधाव दुचाकीने दुसर्या एका दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २८ सप्टेंबरला पंचवटी परिसरातील मुंबई आग्रा महामार्ग सर्वीस रोडवर घडली. साहेबराव फकिरा सानप (५२, रा. साळवी, ता. निफाड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दलिेल्या माहितीनुसार २८ सप्टेंबरला सानप हे आपल्या दुचाकी क्रम एमएच १५, बीजी ६५३५ वरून संतोष टि पॉंईट दिसेस चालले होते. यावेळी अमृधाम बाजुकडून भरधाव आलेल्या दुसर्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
लाखाची घरफोडी
नाशिक – बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख १० हजाराचे सोन्याचे दागिणे व साहित्य चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२) मध्यरात्री भगूरच्या विजयनगर परिसरात घडली. याप्रकरणी संगिता रमेश भोसले (रा. विजयनगर, भगुर) यांनी तक्रारदाखल केली आहे. त्यानुसार भोसले कुटुंबिय बाहेरगावी गेलेले असताना शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडभ कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा सुमारे १ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक उपनिरिक्षक ढगे हे करत आहेत.
रेल्वेखाली उडी मारून एकाची आत्महत्या
नाशिक – एका ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार संसरी शिवार परिसरात शनिवारी (दि.३) सकाळी घडला. याप्रकरणी रेल्वेचे देवळाली येथील उप स्टेशन प्रबंधक दिघो रंजन यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी संसरी गावच्या शिवारात अप रेल्वे लाईनच्या पोल क्र.१८३/४ व १८३/६ च्या दरम्यान अनोळखा ३५ वर्षीय व्यक्तीने चालत्या रेल्वेसमोर उडी मारली. रेल्वेची जोराची धडक बसल्याने यामध्ये तो जागीच ठार झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक उपनिरिक्षक हांडोरे करत आहेत.
शहरात दोघांच्या आत्महत्या
नाशिक – शहरात विविध दोन घटनांमध्ये दोघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना शनिवारी (दि.३) पंचवटीतील पेठरोड व सातपूरच्या शिवाजीनगर भागात घडल्या. पेठरोडवरील राहुलवाडी येथील चंद्रकांत शाम घुटे (३५) याने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्याघरी छतास दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना सातपुरच्या शिवाजीगनर भागात घडली. येथील गणेश गंगाराम गोरे (३५) याने मद्याची नशा तसेच मानसिक तणावातून राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.