नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने नवे पतधोरण जाहीर केले आहे. यानुसार रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) व्यवस्था डिसेंबर महिन्यापासून २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ग्राहकांना व्यवहारासाठी आरटीजीएस सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान सुरु आहे. मात्र, यापुढे २४ तास सुविधा देण्यात येणार आहे. तसेच, २०१९ मध्ये, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सुविधा आरबीआयने २४ तास सुरु केली आहे. याबाबत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अधिकृत माहिती दिली आहे. अलीकडच्या काळात ऑनलाईन पेमेंट सुविधेला गती मिळाली आहे. परंतु, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. यात एनईएफटी, आरटीजीएस आणि इन्स्टंट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) यासारख्या अनेक सुविधा पुरवण्यात येतात.
या तिन्ही सेवांविषयी अधिक जाणून घ्या…
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी)
एनईएफटीचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पैसे पाठवू शकता. बँकेच्या मोबाइल अॅप किंवा नेट बँकिंग सुविधेद्वारे एनईएफटीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस)
आरटीजीएस प्रक्रियेमध्ये रिअल टाईममध्ये लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातात. प्रामुख्याने मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी ही सुविधा पाठवली जाते. कॉर्पोरेट संस्थां मोठ्या प्रमाणात या सुविधेचा वापर करतात. आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यासाठी किमान रक्कम २ लाख रुपयांची आहे. आरटीजीएससाठी ऑनलाईन पद्धतीने अर्थात इंटरनेट बँकिंग, मोबाईल अँप्लिकेशद्वारे सुविधा वापरल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही, परंतु काही बँका बँक शाखेतून व्यवहार करण्यासाठी ठराविक शुल्क आकारतात.
इमिजीएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस)
बँकांच्या ऑनलाईन मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग, एसएमएस आणि एटीएमद्वारे रिअलटाइम ट्रान्सफरची सुविधा देते. आयएमपीएस प्रणालीमध्ये, भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) सदस्यत्व असणे आवश्यक असते. वर्षभरात २४ तास ही सुविधा सुरु असते.