पुणे – ऑनलाईन भाडेकरार नोंदविण्यात असंख्य अडचणी येत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. मुद्रांक विभागाला मोठा महसूल मिळत असूनही या अडचणींकडे विभागाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. १ जानेवारीपासून ग्राहकांचे युआयडी व्हेरिफिकेशन होत नाही. तसेच फ्लॅश प्लेयर सुविधा सुद्धाही बंद झाली आहे. त्यामुळे मालक, भाडेकरी व साक्षीदार यांचे छायचित्र देखील भाडेकरारासाठी काढता येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
आयडी सविता प्रणालीवरील भाडेकरार साईट मधील अडथळे दूर करून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात, अशी मागणी असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटच्या वतीने नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले आहे. ऑनलाइन भाडेकरार नोंदणी त्यांना असंख्य अडचणी येत आहेत. अशी तक्रार या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
बोटाचे ठसे घेताना एका खासगी कंपनीचे थम स्कॅनर वापरावी अशी सक्ती भाडेकरार या संकेतस्थळावर होत आहे सदर यंत्र सुमारे साडेतीन हजार रुपयांची असून त्यांच्या दुरुस्तीसाठी देखील सुमारे पाचशे रुपये शुल्क आकारले जात आहे तसेच २४ तासात २५ बोटांचे ठसे झाल्यास यंत्र बंद पडते. अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकांचे ठसे सदर यंत्र स्वीकारत नाही याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
काय आहे ऑनलाइन भाडेकरार नोंदणी पद्धती ?….
- जमीन आणि घरांच्या खरेदी विक्रीच्या नोंदणीपाठोपाठ भाडे तत्वावरील करारही ऑनलाइन पध्दतीने करण्याची मुभा सरकारने दिली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारे वेब कॅम आणि थंब स्कॅनर प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. तसेच आता हे करार करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांना तसे अधिकार देण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतल्यामुळे ऑनलाइन भाडे करार करण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.
- एखादा फ्लॅट, घर किंवा व्यावसायिक गाळे भाडे तत्वावर देताना कराराची नोंदणी करावी लागते. परंतु, कधी मालक, भाडेकरूंच्या वेळा जुळत नाहीत. कधी साक्षीदार वेळेवर येत नाहीत, सरकारी कार्यालयातील अनागोंदीमुळे वेळेचा अपव्यय होतो आणि दलालांचा विखळा असतो. अशा अनेक कारणांमुळे या करारांमध्ये अडथळे येतात. ही सारी कोंडी फोडण्यासाठी भाडे करारांचीही ऑनलाइन नोंदणी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. परंतु, केवळ भाडेकरार करण्यासाठी घरमालकांना वेब कॅम किंवा थंब स्कॅनर खरेदी करणे शक्य नसल्याने ऑनलाइन भाडे करार योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे धोरणात थोडा बदल करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे.
- एखाद्या सोसायटीने जर पुढाकार घेतला तर, त्यांना अशा ऑनलाइन नोंदणीचे अधिकार दिले जातील. केवळ त्या सोसायटीतल्याच नव्हे; तर आसपासच्या सोसायट्यांतील भाडे करारही नोंदवून देण्याची मुभा त्यांना दिली जाईल. ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल ते नाममात्र शुल्कही आकारू शकतात. त्यासाठी या सोसायट्यांना इंटरनेट कनेक्शन, वेब कॅम आणि थंब स्कॅनर अशी यंत्रसामग्री घ्यावी लागेल, अशी माहिती मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाने दिली.
- नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसेस या सदराखालील ई- रजिस्ट्रेशन सुविधेद्वारा ऑनलाइन नोंदणी करता येते. तिथे स्वतःचा पासवर्ड तयार करावा लागतो. मालमत्तेचा तपशील नोंदवल्यानंतर एक टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर भाडेकरू, मालक आणि दोन साक्षीदारांचा सविस्तर तपशील भरावा लागतो. मुद्रांक शुल्काचा भरणाही ऑनलाइन करता येतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षकार आणि साक्षीदारांच्या नावांची यादी येते, डिजिटल सहीनंतर २४ तासांत दुय्यम निबंधकाकडून त्या दस्तावेजावर निर्णय होतो आणि तो ऑनलाइनच कळविला जातो.