नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीविरोधात लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. देशात आतापर्यंत ६.५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आजपासून ४५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे. लस घेण्यासाठी आपले ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. परंतु तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन न करतासुद्धा लस घेऊ शकता. सरकारकडून यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिक लसीकरणासाठी cowin.gov.in पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतात. जर कोणी रजिस्ट्रेशन करू शकले नाही तर ते कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन ३ वाजेनंतर आपले रजिस्ट्रेशन करून लस घेऊ शकतात.
काय करावे लागेल
कोरोना लसीकरण केंद्रावर तुम्हाला ओळखपत्र जसे आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. त्याशिवाय पासपोर्ट, रेशनकार्ड किंवा बँकेचे पासबुकसुद्धा ओळखपत्र म्हणून सादर करू शकतात.
पुढील टप्पा सुरु
कोरोना विषाणूविरोधात लसीकरण अभियानातील आणखी एका टप्प्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये ४५ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण करता येत आहे. देशात ४५ वर्षांहून अधिक वयाचे लोक एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३४ कोटी आहेत. केंद्राने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील या वयोगटातील लोकांना १५ दिवसांच्या आत लस लावून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.