नाशिक – सध्या एकीकडे ऑक्सिजन अभावी कोरोना बधीत रुग्णांवर उपचार करणे अवघड होत असतानाच दुसरीकडे ऑक्सिजन’वर अवलंबून असलेल्या उद्योजकांना देखील ऑक्सीजन सिलेंडर चा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सदर उद्योग संकटात सापडले आहेत.
नाशिक जिल्ह्यात सुमारे दीड हजार स्टील उद्योग ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. त्यात मोठे उद्योग स्टील संबंधी उद्योग, व्यवसायांचा समावेश असून ऑक्सिजनच्या पुरवठयाअभावी यातील चार उद्योग बंद पडले आहेत, तर उर्वरित आणखी आठ उद्योग एक-दोन दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. या उद्योगांमध्ये मेटल कोटींचे काम चालते सुमारे पाच हजार कामगार या प्रमुख उद्योगात काम करतात. ते बंद पडल्यास कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक व्यवहारावर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या उद्योजकांना ऑक्सिजनच्या सिलेंडरचा पुरवठा करावा, अशी मागणी निमा आणि आयमा या उद्योजकांच्या संघटनांनी केली आहे.
दरम्यान, वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनच्या सिलेंडरचा तातडीने पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून ऑक्सिजनला पर्याय म्हणून नायट्रोजनचा वापर करण्यास उद्योजकांना सुचविण्यात आले आहे. मात्र या हा पर्याय पुरेसा नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यातच मोठ्या कंपन्यांना प्रतिदिन अंदाजे ७५ ऑक्सीजन सिलेंडर लागतात. ऑक्सिजनवर अवलंबून असलेले लहान-मोठे सुमारे पंधराशे उद्योजक असून या उद्योगात पाच हजार कामगार काम करतात. सदर उद्योग बंद पडल्यास कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळेल शकते, त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी उद्योग संघटनांनी केली आहे.