नाशिक – ऑक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज दिल्या आहेत. आज जिल्ह्यातील कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजनचा आणि औषध पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक संचालक माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे आदी उपस्थित होते.
जवळपास दुप्पट पुरवठा
गटाच्या मागील बैठकीत नेमून दिलेल्या कामाची सद्यस्थिती सादर करणेबाबत संबंधित सदस्यांना जिल्हाधिकारी मांढरे यांनी सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सर्व सदस्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या बैठकीत सादर केला. जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी आज रोजी दररोज ३ हजार ८०१ ऑक्सिजनच्या जम्बो सिलिंडरची मागणी असून जिल्ह्यातील आजचा पुरवठा हा ५ हजार ५७१ जम्बो सिलेंडर इतका आहे. याबाबतची माहिती संबंधित महापालिका व नगरपालिका यांचेकडून संकलित केली असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी यावेळी सांगितले.
स्टॉकिस्टची वारंवार तपासणी
जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा हा जिल्ह्यात आज रोजी रुग्णालयांना पुरेसा असून रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरविणाऱ्या स्टॉकिस्ट कडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन माधुरी पवार यांना सूचना दिल्या असून त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वाहनही अधिग्रहीत करून पुरवण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी सदर औषधाचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याबाबत सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.