नाशिक – कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोविड-१९ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी वाढली असून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सिलेंडरचे दर वाढले असून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून अवाजवी दर नियंत्रणात आणावे. असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शिष्टमंडळाने अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांना दिले आहे.
नाशिकमध्ये कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लिक्विड ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. नाशिकला लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा दोन-तीन दिवसानंतर होत आहे. कोरोना संकटापूर्वी ऑक्सिजन सिलेंडरची कमी प्रमाणात आवश्यकता होती. परंतु कोरोना विषाणूमुळे रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरची मागणी दहा पटीने वाढली आहे. यात दोन-तीन दिवसानंतर लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असून वाढत्या रुग्णांची संख्या बघता तो तातडीने वाढविणे गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना.श्री.राजेश टोपे साहेब यांच्या निर्देशानुसार “साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे”. ऑक्सिजन सिलेंडरच्या वाढत्या मागणीमुळे सिलेंडरचे दर अप्रत्यक्षपणे वाढून त्याचा काळाबाजार होणार नाही याकडेही लक्ष देणे महत्वाचे ठरत आहे.
नाशिकला पुरवठा करणाऱ्या तेरा पुरवठादारांवर लक्ष देऊन काही काळाबाजार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश औषध निरीक्षकांना यावेळी सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिले आहे.
याप्रसंगी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, सातपूर अध्यक्ष जीवन रायते, सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, समाधान तिवडे, चेतन कासव, बाळा निगळ, निलेश भंदुरे, सचिन जोशी, निलेश कर्डक, संतोष भुजबळ, दत्तू वामन, अनिस शेख, किरण शिंदे, महेश जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.