नाशिक – उद्योगांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने नाशकातील स्टील उद्योग संकटात सापडला आहे. त्यामुळेच या उद्योगातील हजारो कामगारांवर टांगती तलवार असल्याचे निदर्शनास येत आहे. यासंदर्भात नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)ने उद्योगमंत्री, विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उद्योगांना लागणारा ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलला उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन उत्पादक हे ज्या उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करतात त्यांनी हा पुरवठा तात्काळ पुढील आदेश येईपर्यंत पूर्णतः बंद करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिला आहे. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, उद्योग व संघटना यांच्यावर कठोर आदेश निर्देशित करण्यात आले आहे. परंतु कोविड महामारी दरम्यान जिल्ह्यातील उद्योग आधीच मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले असताना उद्योग कशा पद्धतीने चालवावे हा गंभीर प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे, असे निवेदनात मूद करण्यात आले आहे.
२० टक्के ऑक्सिजन पुरवावा
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या ऑक्सिजन पुरवठा संदर्भातील प्राप्त आदेशानुसार कंटीन्यूअस प्रोसेसिंग स्टील उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा जर मिळाला नाही तर सदर कंपन्या बंद पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या २५०० हून अधिक कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर होणार आहे. जर सदर स्टील कंपन्यांना कमीत कमी २० टक्के पुर्नभरण करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती निमाच्यावतीने करण्यात आली आहे. पत्रावर निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.