लंडन – कोरोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोनाचा खात्मा करण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या एझेडडी १२२ लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आल्यावर धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ही लस देण्यात आली होती. मात्र व्यक्ती आजारी पडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिले आहे.
जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असल्याचे बऱ्याच देशांमध्ये लस तयार करण्याचे काम सुरु आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनिकाची ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती. भारतातही या लसची चाचणी सुरु झाली होती. ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणी दरम्यान एका व्यक्तीच्या शरीरावर दुष्परिणाम दिसू लागले. त्यामुळे या लशीची पुढील चाचणी थांबवण्यात आली आहे.
खरं तर लस बनवण्याची प्रक्रिया सुरु असताना चाचणी थांबवणे ही बाब नवी नाही. परंतु भारतासह जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असताना लवकरात लवकर त्याच्यावरील लस तयार करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. ही लस बनवण्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनिका आघाडीवर होते.