नाशिक – शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नाशिक पोलिसांनी वाहन तपासणीकडे पुन्हा मोर्चा वळविला आहे. वाहतुकीचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.
शहरातील गुन्हेगारी आणि पोलिसांची कामगिरी यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयुक्त पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, लॉकडाऊननंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीची आम्ही दखल घेतली असून आम्ही विविध प्रकारची कारवाई करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचाच एक भाग म्हणून शहरात वाहन तपासणीची कारवाई सुरू केली आहे. यामुळे चेनस्नॅचर्ससह अन्य गुन्हेगारांनाही वेसण बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केव्हाही, कुठेही होणार
वाहन तपासणी संदर्भात शहरातील सर्व पोलिस स्टेशनला आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वेळी किंवा अवेळी केव्हाही वाहन तपासणी केली जाणार आहे. तपासणीत संशय आल्यास कागदपत्रांची तपासणी आणि त्यानंतर सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पाण्डेय यांनी स्पष्ट केले. या वाहन तपासणीत सर्वसामान्य नागरिकांना काहीशी गैरसोय होणार असली तरी यामुळे गुन्हेगारांना हुडकून काढणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.