लंडन – नवीन वर्षात ब्रिटन मध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. सुमारे चार दशकांपासून युरोपियन युनियनचा ( ईयु ) भाग असलेले ब्रिटन ३१ डिसेंबर रोजी पूर्णपणे त्यापासून विभक्त होत आहे. विभक्त झाल्यानंतर, व्यापारासंदर्भात दोन्ही बाजूंच्या ऐतिहासिक करारास बुधवारी ब्रिटनच्या संसदेने मंजुरी दिली.
हाऊस ऑफ कॉमन्सच्या बाजूने ५२१ तर विरोधकांना ७३ मते होती. अप्पर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये यावर चर्चा होईल. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ईयू नेत्यांनी बुधवारी या करारावर स्वाक्षरी केली. युरोपियन युनियनमधून ब्रिटनचे ब्रेक अप झाल्यानंतर व्यापार संबंध निश्चित करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून उभय देशांमधील चर्चा सुरू होती. युरोपियन युनियन आणि ब्रिटन यांच्यात दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ७४ लाख कोटी रुपये) व्यापार होतो. संसदेच्या विशेष बैठकीत जॉन्सन म्हणाले, “ब्रेक्झिट हे शेवट नसून एक सुरुवात आहे.” देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार देण्यासाठी युरोपियन युनियन सोबत काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बोरिस जॉन्सन म्हणाले
ब्रेक्झिटनंतर आम्हाला मिळालेले हक्क वापरण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शनिवारी ब्रिटनने युरोपियन युनियनबरोबर व्यापार कराराचा मजकूर प्रसिद्ध केला. ईयू-यूके व्यापार आणि सहकार्य करार नावाच्या करारामध्ये एकूण १ हजार २४६ पृष्ठे नमूद केली आहेत. या करारामध्ये अणु उर्जा, गोपनीय माहितीचे वाटप आणि अणुऊर्जेचा शांततापूर्ण उपयोग करणे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे. या कराराअंतर्गत १ जानेवारीपासून दोन्ही पक्ष एकमेकांच्या प्रदेशात शुल्कमुक्त व प्रमाणमुक्त व्यापार करण्यास मोकळे असतील. एवढेच नव्हे तर सागरामध्ये मासेमारीची जुनी व्यवस्थाही साडेपाच वर्षे कायम राखली जाईल.