नाशिक – तब्बल १८४० मध्ये सुरु झालेले सार्वजनिक वाचनालय (सावाना) प्रथमच सलग २१० दिवस बंद राहिले आणि आज ते पहिल्यांदाच उघडले. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारला वाचनालये उघडण्याची प्रेरणा मिळाल्याने सावाना पुन्हा गजबले आहे.
सार्वजनिक वाचनालयाची सुरवात १८४० साली झाली. १५० वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले नाशिकचे सावाना प्रथमच कोरोना काळात सात महिने बंद ठेवण्यात आले. याआधीच्या इतिहासात २१० पेक्षा जास्त दिवस वाचनालय कधीही बंद नव्हते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने करण्यात आलेल्या देशव्यावी लॉकडाऊनमुळे वाचकांसाठी वाचनालयाची दारे बंद होती. अखेरीस, आजपासून वाचनालय पुन्हा सुरु झाले आहे. त्यामुळे वाचकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील ग्रंथालये आणि वाचनालये बंद ठेवण्यात आले होते. मात्र, अखेरीस शासनाला जाग आल्याने शहरातील वाचनालये सुरु करण्यात आली आहे. शासकीय तसेच खासगी वाचनालय आजपासून सुरु झाले असून वाचकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
शहरातील विविध वाचनालये तसेच ग्रंथालयांमध्ये आज सकाळपासून वाचकांनी पुस्तक बदलीसाठी हजेरी लावल्याचे दिसून आले. तब्बल सात महिने बंद असलेले वाचनालय अखेरीस सुरु झाल्याने वाचकवर्गात आनंदाचे वातावरण दिसून आले. वाचनालय लवकर सुरु व्हावे यासाठी प्रयत्न सुरु असतांना मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आजपासून वाचनालय सुरु करण्यात आले आहे. यावेळी सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले.
शासनाच्या नियमांचे पालन होत असल्याचे यावेळी दिसून आले. पुस्तक बदलण्यासाठी येतेवेळी वाचकांनी मास्क लावणे आवश्यक आहे. मास्क नसल्यास वाचनालयात प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट आदेश संबंधित वाचनालयाने दिले आहेत. यावेळी टेंपरेचर गनद्वारे वाचकांचे तापमान मोजून प्रवेश देण्यात आला. सार्वजनिक वाचनालय येथे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना होत असल्याने वाचकांनी वाचनालयाच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे.