नाशिक – श्री सप्तशृंगी निवासिनी देवी, सप्तशृंग गड ट्रस्टच्या इतिहासात गेल्या ४५ वर्षात प्रथमच विश्वस्तपदी महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. हा मान नाशिकच्या मनज्योत पाटील यांना मिळाला आहे. पाच वर्षांच्या मुदतीसाठी महिला विश्वस्त म्हणून त्यांची निवड झाली आहे.
ट्रस्टच्या घटनेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश काम पहातात आणि जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. समितीवर मनज्योत पाटील यांची विश्वस्त म्हणून नेमणूक केली. ललित निकम, दीपक पाटोडकर, प्रशांत देवरे आणि भूषणराज तळेकर यांचा समावेश असलेल्या पाच उमेदवारांमध्ये पाटील यांचा समावेश होता. त्यांची १ ऑक्टोबर पासून पाच वर्षांच्या मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अनेक महिला उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले होते. परंतु त्यापैकी कोणालाही या निकषांची पूर्तता करता आली नाही. मात्र यावर्षी विश्वस्त पदासाठी काही महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर त्यांची पात्रता लक्षात घेऊन नाशिकचे धर्मादाय आयुक्तांचा अभिप्राय घेतल्यानंतर समितीने मंगळवारी सायंकाळी अंतिम नेमणुका घोषित केल्या, असेही सूत्रांनी सांगितले. आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना पाटील म्हणाल्या की, सप्तशृंगी देवीच्या आर्शिवादाने त्यांची नेमणूक झाली असून हे माझे भाग्य समजते आहे की, मला ट्रस्टचे काम हाती घेण्याची उत्कृष्ट संधी मिळाली आहे. उद्योगांमधून निधी आणण्याची योजना करण्याबरोबरच ट्रस्टच्या सहकार्याने आरोग्यसेवा आणि शिक्षणातील विविध पावले उचलण्याचे माझे उद्दीष्ट असल्याचेही पाटील म्हणाल्या.