ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने चौथ्या कसोटीत अतिशय बहारदार विजय मिळवून २-१ अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली आणि इतिहास रचला आहे. या मालिकेद्वारे भारताने ऑस्ट्रेलियाचे गर्व हरण केले आहे. गेल्या साडेतीन दशकात ऑस्ट्रेलिया मायदेशात कधीच पराभूत झाला नव्हता. पण, भारतीय संघाने हे करु दाखविले आहे. १९८८ नंतरचा ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पराभव आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा दौरा भारतासाठी अतिशय खडतर असा होता. सुरुवातीच्या तीन सामन्यात रोहित शर्मा जायबंदी होता, संघाचा कर्णधार विराट कोहली रजेवर निघून गेला, पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजयी बढत घेतली होती, त्यावेळेला अवघ्या ३७ धावात अख्खा भारतीय संघ गारद होण्याची नामुष्की ओढवली गेली. भारतीय संघाच्या अडचणी इथपर्यंतच थांबल्या नाहीत. यानंतर मुख्य खेळाडू जायबंदी झाले. ऑस्ट्रेलियाने देखील अखिलाडू वृत्ती दाखवत भारतीय संघाचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी नेहमीप्रमाणे स्लेजिंगचा अखिलाडू पर्याय निवडला. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी वर्णभेदी टोमणे मारले. एवढेच नव्हे तर मैदानाबाहेर भारतीय संघातील खेळाडू हे स्थानिक नियमांचे पालन करीत नाहीत अशा बातम्या पसरवून खेळाडूंचे मनोधैर्य खच्ची करण्याचे पूर्ण प्रयत्न झाले. परंतु अशा परिस्थितीतही भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही मालिका जिंकून आता इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात जिंकणे हे अतिशय कठीण मानले जाते इतिहासाची पानं हेच सांगतात. परंतु अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या खेळाडूंनी हा इतिहास आता बदलून टाकला आहे.
दुसऱ्या डावात भारतीय संघाने अतिशय शानदार खेळी केली. एकदिवसीय सामन्याप्रमाणे भारतीय संघ मैदानात खेळत होता. त्यामुळेच ही मालिका आणि कसोटीही भारताने जिंकली. सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी केली. तसेच, चेतेश्वर पुजाराच्या साथीने संघाला सावरले. कर्णधार अजिंक्य रहाणे २४ धावांवर बाद झाला. पुजाराने रिषभ पंतच्या साथीने पुन्हा बहारदार सोबत केली. मात्र, ५६ धावा करुन बाद झाला. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला विजय मिळवीन दिला. रिषभ पंतने ८९ धावांचा शानदार खेळ केला. चौकार मारुन त्याने भारताला विजय प्राप्त करुन दिला. या कसोटीच्या निमित्ताने भारताला नवे दमदार खेळाडू गवसल्याचे स्पष्ट झाले आहे.
धावफलक असा
ऑस्ट्रेलिया – ३६९ आणि ३३६
भारत – २९४ आणि ३२९/७
बघा, भारताने मालिका जिंकली तो विजयी क्षण