केप केनेवेरल – मंगळ ग्रहावर कधी जीवसृष्टी अस्तित्त्वात होती की नाही, याचा शोध घेण्याचे काम अनेक वर्षांपासून नासा करते आहे. यात आता इतर देशांचा सहभागही वाढता आहे. या महिन्यात तीन अवकाशयान मंगळ ग्रहावर उतरणार आहेत. त्यातील दुबई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीच्या यानाने मंगळाच्या कक्षेत पोहचून इतिहास रचला आहे. आता अवघ्या तासांनी चीनचे अवकाशयान मंगळावर पोहोचेल. या दोन्ही यानांनंतर आठवड्याभराने नासाचे यान मंगळावर उतरणार आहे. हे यान तेथील माती तसेच काही टेकड्यांचे तुकडे गोळा करून पृथ्वीवर परतेल.
मंगळावर अंतराळयान पाठवणाऱ्या देशांमध्ये आता संयुक्त अरब अमिराती आणि चीन यांचा नव्याने समावेश झाला आहे. याआधीचे त्यांचे प्रयत्न फोल ठरले आहेत. २०११ मध्ये रशियाच्या मदतीने चीनने एक प्रयत्न केला होता. पण तो असफल ठरला. तर दुसरीकडे दुबईतील अंतराळशास्त्रज्ञ आपल्या या पहिल्या प्रोजेक्टबाबत खूप उत्साही आहेत. युएई मंगळ अभियानाचे प्रोजेक्ट मॅनेजर ओमरान शरीफ म्हणाले की, आमचे स्वप्न पूर्ण होत असल्याने आम्ही आनंदी आहोत. पण थोडी भीतीही वाटते आहे. ही तीनही याने थोड्या थोड्या दिवसांच्या अवधीने सोडण्यात आली होती. त्यामुळे मंगळ ग्रहावर उतरण्याची त्यांची वेळही सारखी असण्याची शक्यता आहे.
मंगळावर जीवन अस्तित्वात आहे की नाही, हे शोधण्यासोबतच या ग्रहाबद्दल अधिकाधिक माहिती मिळवणे, हे या मोहिमेचे उदि्दष्ट असल्याचे नासाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यात जर काही महत्त्वाची माहिती हाती लागली तर याचा आपल्याला फायदाच होणार आहे.
चीन दुसरा देश ठरणार?
आतापर्यंत केवळ अमेरिकेनेच मंगळावर यशस्वीरित्या आपले यान उतरवले आहे. आता युएईच्या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे. तर, चीनचे यानही मंगळावर काही वेळातच पोहचणार आहे. त्यामुळे चीन किंवा युएई यांच्यापैकी कुठला देश दुसरा ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.