गोरखपूर (उत्तर प्रदेश) – सरत्या वर्षाने कितीही त्रास दिला असला तरी नवीन वर्षाच स्वागत सर्वांनीच उत्साहात आणि नवीन उमेदीने केलं. पण भारतातील एक गाव असेही आहे, की जे नववर्षाचे स्वागत कधीच करत नाही. त्यासाठी कारणीभूत आहे एक विचित्र कारण.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात भैरोपूर गावात नवीन वर्षाचे स्वागत होत नाही. गेल्या चार वर्षांपासून डिसेंबर महिन्यातच इथे कोणाचा ना कोणाचा मृत्यू होतो. त्यामुळे कोणीच नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करू शकत नाही.
२०१६ पासून हा प्रकार सुरू आहे. डिसेंबर २०१६ मध्ये गावात रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते. ती पाहण्यासाठी आलेल्या एक तरुण गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले पण, २९ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर आजपर्यंत येथे रामलीला झालेली नाही. २०१७ तसेच २०१८ मध्ये गावातील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.
डिसेंबरच्या शेवटच्याच आठवड्यात होत असलेल्या या मृत्यूंमुळे नवीन वर्ष उत्साहात साजरे करण्याची कोणाची इच्छाच नसते. २०१९ मध्येही एक मुलाने आपल्या वडिलांची गोळी घालून हत्या केली. तर यंदा २९ डिसेंबरला गावातील एका तरुण सेल्समनचा अपघाती मृत्यू झाला. यातून सावरत नाही तोच ३१ तारखेला एकाने आत्महत्या केली. याच कारणासाठी २०१६ पासून हे गाव नवीन वर्षाचे स्वागत करत नाही.