नाशिक – राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील सर्व विभागात एसटी बसेस सुरू करण्यात आल्या असून प्रवाशांचा मात्र अद्याप फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने राज्य परिवहन महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच – सहा महिन्यांपासून एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र आता एसटी महामंडळाच्या सर्व विभागात धावत असून कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता सर्व नियमांचे पालन करीत पन्नास टक्के प्रवासी क्षमता ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, अशी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना व सरकारला अपेक्षा होती. मात्र प्रवाशांनी अद्याही एसटीकडे पाठ फिरवलेली दिसते. प्रथम तालुकास्तरावर एसटी सुरू करण्यात आली, त्यानंतर जिल्हा अंतर्गत आणि आता राज्य पातळीवर बससेवा सुरू करण्यात आली . मात्र प्रवाशांची काळजी घेण्यासाठी सर्व नियम पाळण्यात येत होते. त्यामुळे एका बसमध्ये साधारणत २२ प्रवासी बसत होते. त्यानंतरच दुसरी बस सोडण्यात येत होती. आता राज्यातील प्रमुख शहरांतून बस सेवा सुरू झाली असून औरंगाबाद, नाशिक, पुणे,ठाणे,मुंबई, धुळे, जळगाव, नागपूर अशा लांब पल्ल्याच्या गाड्या देखील धावू लागल्या आहेत. नाशिक विभागात सध्या सुमारे २२५ बस धावत असून आगामी काळात प्रवाशांची संख्या वाढल्यास आणखी बस सुरू करण्याचा राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाचा विचार आहे. मात्र अद्याप पुरेसे प्रवासी बसमध्ये दिसत नसून त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची फारशी गर्दी दिसत नाही. मात्र आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.