पुणे – ३० जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या शरजील उस्मानी विरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या परिषदेचा आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यात उस्मानी याने हिंदू धर्माविषयी काही अवमानजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले होते. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हालचाली सुरु झाल्या. शरजील उस्मानी याला काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. तो जामिनावर बाहेर असून पुण्यात एल्गार परिषदेत वक्ता म्हणून उपस्थित होता. या परिषदेत त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.