नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्रालयाने १ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. केंद्राचे नवे आदेश राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशांसाठी लागू असणार आहेत. यात सर्व भागांमध्ये चाचण्या, ट्रॅकिंग आणि उपचार याचे कठोर पालन प्रशासनाला करावे लागणार असल्याचे स्पष्ट नमूद आहे. याशिवाय लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढत असेल तर स्थानिक प्रशासन स्थानिक दळणवळण व वाहतुकीवर निर्बंध घालू शकते. मात्र आंतरराज्यीय वाहतूक आणि मालवाहतुकीवर निर्बंध घालता येणार नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. विदेशातून होणाऱ्या व्यापाराशी संबंधित वाहतुकीवरही कुठलीच बंदी नसेल. ज्या राज्यांमध्ये आरटी–पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी आहे, त्यांनी वाढवून ७० टक्क्यांवर किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढवावे, असे केंद्राने म्हटले आहे. नव्या रुग्णांवर उपचार करणे किंवा त्यांना तातडीने होम क्वारंटाईन करणे यावर प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यांच्या संपर्काचे ट्रॅकिंग करून परिसर सील करण्यावरही लक्ष केंद्रीत करावे, अश्या सूचना नव्या आदेशांमध्ये आहेत.
केंद्रीय गृहसचिवांचे राज्यांना पत्र
-
१ एप्रिलपासून कोव्हीन पोर्टलवर ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करा
-
बदललेल्या नियमांनुसार कोव्हीन सॉफ्टवेअरमध्येही सुधारणा व्हावी
-
गंभीर आजार असलेल्यांनी प्रमाणपत्र आणण्याची गरज नाही
-
कोरोना लसीकरण केंद्रांचा जास्तीत जास्त वापर करावा