नवी दिल्ली – राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणारा मोठा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एनसीसी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे. नजिकच्या काळात शाळा व महाविद्यालये उघडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी अनोखे अॅप विकसित करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली डायरेक्टरेट जनरल नॅशनल कॅडेट कॉर्प (डीजीएनसीसी) अंतर्गत एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल प्रशिक्षण अॅप करण्यात आले आहे. हे अॅप देशभरातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संरक्षणमंत्र्यांनी अॅपच्या लाँचिंगवेळी एनसीसी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. प्रत्यक्ष शारीरिक संपर्कावरील निर्बंधामुळे कोविड १९ अंतर्गत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे अॅप डिजिटल शिक्षणात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या लढाईत विविध कामे पार पाडून अग्रगण्य कोरोना योद्धांना पाठिंबा देणाऱ्या एनसीसी विद्यार्थ्यांच्या योगदानाचे सिंह यांनी कौतुक केले. ते म्हणाले, एनसीसीने देशातील एकता, शिस्त, देशसेवेचे मूल्य दिले आहेत व विद्यार्थी त्यावर मार्गक्रमण करत आहेत. यावेळी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ नागरी व सैन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.
असे आहे अॅप
डीजीएनसीसी मोबाइल प्रशिक्षण अॅपचे उद्दीष्ट एनसीसी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, प्रिसिस, प्रशिक्षण व्हिडिओ आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न) एका व्यासपीठावर प्रदान करणे शक्य झाले आहे. एखाद्या विषयात अडचण आल्यास संबंधित पर्यायाचा वापर करून अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न पोस्ट करता येणार आहेत. त्याचे उत्तर पात्र शिक्षकांच्या पॅनेलद्वारे दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया व्हिजनच्या अनुषंगाने एनसीसी प्रशिक्षण स्वयंचलित करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल असेल आणि साथीच्या आजाराच्या या चाचणी काळात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण साहित्यात सुलभतेने प्रवेश करण्यास मदत होईल, असे सिंह म्हणाले.