नवी दिल्ली – देशाच्या सरहद्दीजवळच्या आणि तटवर्ती भागातील १७३ जिल्ह्यांमधे राष्ट्रीय छात्रसेनेचा (एनसीसी) विस्तार करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. यामुळे देशभरातील अनेक शाळांमध्ये एनसीसी चे केंद्र सुरू होणार आहे.
सद्यस्थितीत एनसीसीचे कामकाज मर्यादित आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सीमावर्ती भागात नियुक्ती दिली जात नाही. मात्र, आता केंद्र सरकारने एनसीसीला अधिक बळ देण्याचे निश्चित केले आहे. नव्या विस्ताराअंतर्गत एक हजारपेक्षा जास्त शाळा व महाविद्यालयांमधे राष्ट्रीय छात्र सेना सुरु करण्यात येणार आहे. सुमारे १ लाख छात्रसैनिकांची भरतीही होणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणासाठी लष्कराची ५३, नौदलाची २० आणि हवाईदलाची १० अशा एकूण ८३ युनिट्सची क्षमता वाढवण्यात येणार आहे.