नाशिक : लाचखोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या एनडीएसटी सोसायटीच्या चेअरमन पदी मोहन चकोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लाचखोरीत गुन्हा दाखल झालेले रामराव बनकर यांना त्यामुळे चेअरमन पदावरून पाय उतार व्हावे लागले आहे. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकातील पन्नास टक्के रकमेची मागणी केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाखा व्यवस्थापक व व्यवस्थापकाला लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. तर बनकर यांचाही यात सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक झाली होती. उपनिबंधक कार्यालयाकडून याप्रकरणी चौकशी सुरू असून शिक्षक सभासदांनी भ्रष्टाचाराचे आरोप करीत सखोल चौकशीची मागणी केली आहे.